केज विधानसभा निवडणुकीची चर्चा नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांच्या भोवती… दमदार भावी आमदार म्हणून जनते कडून पसंती
केज विधानसभा मध्ये अदृष्य शक्ती करणार नवा महाप्रयोग.
केज (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुक महिन्यावर येवून ठेपली आहे. महायुतीच्या भाजपचा उमेदवार अंतिम झाला आहे. महायुतीची उमेदवारी ही आ.नमिताताई मुंदडा यांनाच आहे. तर महाविकास आघाडीकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने ऐनवेळी उमेदवार जाहिर होणार आहे. काहींनी थेट शरदचंद्र पवारांमार्फत, काहींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामार्फत तर काहींनी खा.बजरंग सोनवणे यांच्या मार्फत फिल्डिंग लावली आहे. यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष असणार आहे. हे सर्व सुरु असताना आता केजमध्ये नवीनच चर्चा सुुरु झाली आहे. केज मतदारसंघातील अनेक नाराज व दुखी नेते एकत्र येवून नवा प्रयोग करीत आहेत तशी तयारी सुरु झाली आहे. नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या माध्यमातून नवा प्रयोग अंमलात आणला जात आहे. मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची उमेदवारी मिळावी यासाठी सर्वांचे प्रयत्न जोरात सुरु आहेत. नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी केज विधानसभा मतदार संघातील निवडणुक रंगात आणली आहे.
केज विधानसभा निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीअगोदर महाविकास आघाडीची उमेदवारी घ्यायलासुद्धा कोणी पुढे येत नव्हते परंतु महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत दाखविलेला परफार्मेन्स आणि जनता जनार्धनांनी दिलेली साथ यामुळे महाविकास आघाडीकडे आज तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जिंकण्यासाठी अनेकांनी खा.शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे व काँगे्रस नेत्यांकडे रांगा लावल्या आहेत. केज विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना असणार आहे. त्यामुळे मतदारसंघातून अनेक नेते हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या दिशेने जात आहेत. केजमधून भाजपच्या उमेदवार आ.नमिताताई मुंदडा यांची उमेदवारी अंतिम असल्याने आजपर्यंत कोणीही त्या ठिकाणी दावा केलेला नाही. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून प्रभावी दावेदार म्हणून पृथ्वीराज साठे हे आहेत तर त्याठिकाणी सध्य स्थितीला डॉ.अंजलीताई घाडगे यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे परंतु उमेदवारी मिळावी म्हणून माजी आ.संगिताताई ठोंबरे, रमेश गालफाडे, सौ.मनिषाताई गोकुळ जाधव, इंजि.एन.डी.शिंदे, विजयकुमार वाव्हळ आदी उत्सुक आहेत. परंतु खरी चुरस ही पृथ्वीराज साठे व डॉ.अंजलीताई घाडगे यांच्यात दिसून येत आहे. केजमध्ये आता नवीन प्रयोग सुरु झाला आहे नमिताताई मुंदडा यांना पराभूत करण्यासाठी केज विधानसभा मतदार संघातील काही नाराज नेतेमंडळी एकत्र येवून नवा प्रयोग करु पाहत आहे. येत्या काही दिवसात मतदारसंघातील नाराजांची एक व्यापक बैठक आयोजित करण्यात येत आहे. येत्या शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र गणेशोत्सव सुरु असल्याने त्या दरम्यान ही बैठक यशस्वीरित्या पार पडणार नाही म्हणून आठवडभर लांबविली आहे. या बैठकीसाठी नेकनूर, नांदूरघाट, विडा, येवता, आडस, बनसारोळा सह केज तालुका व अंबाजोगाई तालुक्यातील आमदारांवर नाराज असलेल्या नेते मंडळींना पाचारण करण्यात येणार आहे. या बैठकीतूनच सिताताई बनसोड यांची उमेदवारी जाहिर होणार आहे. या बैठकीसाठी मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत. तशी तयारी सुरु झाली आहे. मुंदडा यांची डोकेदुखी वाढविण्याचा व त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी घ्यायची आणि मराठा दलित मुस्लिम या मतांची एकत्र घडी करुन जिंकण्याचा प्रयत्न आहे. नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड या गेल्या अडीच वर्षापासून केज नगरपंचायतच्या अध्यक्षा आहेत त्यासोबतच सामाजिक व राजकीय चळवळीचे त्यांना अंग आहे. केज विधानसभा मतदार संघाचे महिला अत्याचार असो किंवा इतर गंभीरे विषय असोत त्यावेळी नगराध्यक्ष सिताताई बनसोड यांचा पुढाकार दिसून येतो. एक काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या सिताताई बनसोड यांच्या माध्यमातून मतदारसंघात निवडणुक रंगात आली आहे. जेव्हा मनोज जरांगे पाटील होकार भरतील त्यावेळी या निवडणुकीला मोठी रंगत येईल असेच यावरुन दिसते आहे.