ध्येय साध्य करण्यासाठी स्वप्ने मोठी ठेवा: डॉ. सुमित नाहर
सिंधफणा शाळेचा तेवीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
माजलगाव (प्रतिनिधी) – “ध्येय साध्य करण्यासाठी स्वप्ने मोठी ठेवा” असे प्रेरणादायी मत डॉ. सुमित नाहर यांनी व्यक्त केले.
ते माजलगाव येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलच्या २३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. सकाळी शाळेच्या प्रांगणात झालेल्या या भव्य समारंभाला शिक्षकवर्ग, पालक व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सविस्तर वृत्त असे की, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सिंदफणा पब्लिक स्कूलने आपल्या माजी विद्यार्थ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून वर्धापन दिन साजरा केला. मुख्य अतिथी डॉ. सुमित नाहर यांनी शाळेच्या गेल्या २३ वर्षांच्या प्रवासाची दखल घेत शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवून त्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचा संदेश दिला आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे महत्त्व सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले होते. भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन, वाद्य वादन तसेच देशभक्तिपर कवितांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन मोहून टाकले.
विशेषतः विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित नाटिकेचे प्रभावी सादरीकरण केले, ज्याने सर्वांची मनापासून प्रशंसा मिळवली. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शन झाले. शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांनी या शैक्षणिक वर्षातील उपलब्धींची विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. खेळ, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आले. या उपलब्धींमुळे शाळेचे नाव उंचावले आहे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.प्राचार्य शेख यांनी भविष्यातील योजनांची माहिती देत सांगितले की, शाळेत नव्या शैक्षणिक सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचा दर्जा वाढवण्यात येईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगली शिक्षणसुविधा मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल. शाळेच्या भविष्यकाळासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आल्या आहेत.सर्व उपस्थितांनी शाळेच्या भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि या उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी शाळेमध्ये दहा वर्ष पूर्ण केलेल्या विठ्ठल आगे, जयश्री भगस आणि किष्किंधा गायकवाड या कर्मचाऱ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या समन्वयक नीला देशमुख,उपप्राचार्य राहुल कदम, विद्यार्थी प्रतिनिधी आदिल शहा, सानिका सोळंके, सर्व शिक्षक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ.वरुणराज तौर यांनी तर सूत्रसंचालन शाळेचे इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी कुमार कैवल्य सोळंके व कुमारी विद्यार्थिनी वेदिका गवते यांनी केले तर आभार हरीभाऊ सोळंके यांनी केले.