जगाला बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज,पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे प्रतिपादन
शिवणीत थायलंडच्या बुद्ध मूर्तीची झाली प्रतिष्ठापणा
बीड शहरातुन निघाली बुद्ध प्रतिमेची धम्म रॅली
बीड/प्रतिनिधी अवघे जग बौद्ध धम्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोणातुन पाहते. त्यामुळे मानवी जीवन जगत असतात तथागत गौतम बुद्धाने दिलेले तत्वज्ञान अंगिकारले पाहिजे.असे मनोगत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी व्यक्त केले.बीड तालुक्यातील शिवणी येथील महाविहार धम्मभूमी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर, येथे सोमवार (दि.12) मे रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2569 व्या जयंती निमित्ताने बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणा व अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित बौद्ध जनसमुदयास संबोधित करताना नवनीत काँवत बोलत होते. यावेळी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था,बीड तथा बुद्ध जयंती महोत्सवाचे मुख्य संयोजक भिक्खु धम्मशिल थेरो, कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.भिक्खु उपगुप्त महाथेरो तर अध्यक्ष म्हणून डॉ.भिक्खु इंदवंस्स महाथेरो, प्रमुख उपस्थितीत भिक्खु चंद्रमुणी होते.प्रमुख धम्मदेसना भिक्खु महाकाश्यप थेरो, भिक्खु पय्यावर्धन तर प्रमुख पाहुणे म्हणून सीईओ आदित्य जीवने, नायब तहसीलदार सुहास हजारे, अधीक्षक अभियंता व्ही.एल.कांबळे, संपादक कुणाल कांबळे, इंजि बी. के. अदमाने उपस्थित होते.पुढे बोलतांना नवनीत काँवत म्हणाले की, बुद्धाने या जगाला प्रज्ञा,शील, करुणा शिकविली. चक्रवर्ती सम्राट अशोक राजाने बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा जगात प्रचार आणि प्रसार केला. शिल्प आणि शिलालेखाच्या माध्यमातून बुद्धाचे तत्त्वज्ञान या जगात कायम जिवंत आहे आणि जिवंत राहील. भारत हा बुद्धाची जन्मभूमी आहे म्हणून आपल्या देशाची जगात ओळख आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुर येथे बौद्ध धम्म दीक्षा देऊन बुद्धांचे तत्त्वज्ञान पुन्हा आपल्याला अवगत करून दिले आहे. आज शिवनी येथे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. येणाऱ्या काळात या पुण्यभूमीतून तथागताच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होईल असे मनोगत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. प्रदीप रोडे यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक भालेराव यांनी केले. यावेळी प्रा.डॉ. मनोहर सिरसाट यांच्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बुद्ध महोत्सवाला बीड जिल्ह्यासह राज्यभरातून बौद्ध उपासक-उपासिका, आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
धम्म रॅलीने वेधले लक्ष
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथपर्यंत तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य धम्मरॅली काढण्यात आली. या धम्म रॅलीत बौद्ध भिक्खू, बौद्ध उपासक उपासिका, आंबेडकरी जनता पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाली होती. त्यामुळे या रॅलीन बीड शहराचे लक्ष वेधून घेतले होते.
बीड जिल्ह्यात सर्वात मोठी
थायलंड येथील बुद्धमूर्ती!
बीड तालुक्यातील शिवणी येथील महाविहार धम्मभूमी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर, येथे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदरील मूर्ती थायलंड या देशातून आणण्यात आली आहे. बुद्ध महोत्सवाचे संयोजक पूज्य भिक्खु धम्मशिल थेरो यांच्या धम्म चळवळीतून ही मूर्ती बसविण्यात आलेली आहे.