प्रा.धम्मानंद बोराडे यांची औद्योगिक न्यायालयात कार्यकारी सहाय्यक पदावर निवड.
यशोधरा बुद्धविहार माजलगाव च्या वतीने गौरव.
माजलगाव (प्रतिनिधी) – सावरगाव येथील सुपुत्र आणि फुले, शाहू, आंबेडकरी विषयाचे अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. धम्मानंद बोराडे सर (सावरगावकर) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औद्योगिक न्यायालयात कार्यकारी सहाय्यक (Clerk) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचा गौरव यशोधरा बुद्धविहार ट्रस्ट माजलगावच्या वतीने करण्यात आला.अभ्यासू, शांत आणि मनापासून शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे बोराडे सर NET-SET व M.Phil असूनही अनेक वर्षे सुंदरराव सोळंके महाविद्यालय व सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव येथे CHB वर कार्यरत होते. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला अखेर यश लाभले आहे. हे यश केवळ त्यांचेच नव्हे, तर अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंबाजी वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर साळवे सर, प्रा. सुदर्शन स्वामी, अशोक कांबळे, शिवाजी ससाणे सर, पत्रकार रविकांत उघडे, सुभाष बोराडे, सिद्धार्थ पौळ,विष्णू शेळके,विशाल जावळे व आदित्य जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक बाबासाहेब जाधव सचिव, यशोधरा बुद्धविहार माजलगाव यांनी केले. प्रभाकर साळवे सर, प्रा. स्वामी सर, प्रा. राजकुमार सोनवणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोराडे सरांचे यश हे जिद्द, संघर्ष व निष्ठेचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
प्रा. बोराडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आपल्या संघर्षमय प्रवासाची प्रांजळ मांडणी केली. प्राथमिक शिक्षण जि. प. प्रा. शाळा, सावरगाव, माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय सावरगाव येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव येथे पूर्ण झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथून लोकप्रशासन या विषयात एम.ए., नेट, सेट व एम.फिल. केले आहे.आपल्या भाषणात सांगितले की, “बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असल्याने आणि वाचनाची गोडी असल्यामुळेच हे यश शक्य झाले.” तसेच “या प्रवासात प्राथमिक ते पदव्युत्तर मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे, कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे मी विशेष आभार मानतो,” असे त्यांनी नमूद केले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवाजी ससाणे यांनी मानले