कौटुंबिक संस्काराची शिदोरी माता रमाईंकडून शिकावी – प्रा. संजय बागुल
त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी, सावरगाव मध्ये भीम सैनिकांची भव्य उपस्थिती
माजलगाव (प्रतिनिधी): येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. गावातील सर्व भीमसैनिक, माता-भगिनी आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि उत्कृष्ट संयोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
गावातील सर्व भीम सैनिकांनी एकत्र येऊन हा जयंती उत्सव मोठ्या जोशात आणि अनु शासनात पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक मगर, प्रमुख पाहुणे अश्विन टाकणखार, केतन प्रधान, दीपक गायकवाड आणि साई ग्राफिक्सचे मालक अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्य वक्ते प्रा. संजय बागुल सर यांचे प्रभावी भाषण. त्यांनी आपल्या मनोगतात माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत, “कौटुंबिक संस्कारांची खरी शिदोरी माता रमाईंकडून शिकावी” असे प्रतिपादन केले. माता रमाई यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देत मोठ्या त्यागाने आणि संयमाने आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या त्यागातून आपल्या कुटुंब व्यवस्थेत समतोल राखण्याची शिकवण मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात क्रांतिसूर्य संस्थेच्या संपूर्ण टीमला सन्मानित करण्यात आले, तसेच आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन करून संपूर्ण गावाला एकत्र आणले. संयोजकांचे आणि आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, कारण त्यांनी गावाची एकजूट आणि सामाजिक कार्य करण्याची ताकद दाखवून दिली.
रमाई नगर, सावरगाव येथील महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. जयंती कमिटीच्या अध्यक्षस्थानी प्रदीप भैय्या फंदे, उपाध्यक्ष गणेश कुव्हारे, सचिव दीपक बोराडे आणि कोषाध्यक्ष प्रवीण कुव्हारे यांनी जबाबदारी पार पाडली.