केज तालुक्याच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणे अभिमानास्पद : रमेश आडसकर
रमेशराव आडसकर यांच्या कडून प्रियंका इंगळे हीचा आडसला जंगी सत्कार
केज, दि. ७ (प्रतिनिधी) : खो-खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला विश्वकप मिळवून देण्याची किमया या भागाच्या मातीतील प्रियंका इंगळेने केल्याची बाब अभिमानास्पद आहे. पालकांनी पाल्यांना त्यांच्या निवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन अंबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर यांनी केले.शुक्रवारी (दि. ७) तालुक्यातील आडस येथे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ग्रामस्थांच्या वतीने भारतीय महिला खो – खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हीच्या नागरी सत्कार सोहळ्यात श्री. आडसकर बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण अध्यक्षस्थानी होते. माजी उपसभापती ऋषीकेश आडसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भागवत नेटके, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उद्धवराव इंगोले, माजी सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच गोविंद पाटील यांच्यासह प्रियंका इंगळे चे आई-वडील उपस्थित होते. प्रास्ताविक श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी देशाला पहिला खो-खो विश्वकप जिंकून देणाऱ्या प्रियंका इंगळे चा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख एक्केवीस हजार रूपये देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तिच्या आजी-आजोबा व आई-वडीलांचा भरपेहरावाचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थीतांचे स्वागत शालेय विद्यार्थींनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आले.रमेशराव आडसकर म्हणाले, प्रियंका सारख्या गुणवान खेळाडूंची प्रेरणा घेऊन आपणही चांगले खेळाडू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण खेळाडूंना शासकीय सेवेत ही विशेष संधी आहे. राजेश्वर चव्हाण म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्याचे नाव विविध कारणांनी बदनाम होत असताना प्रियंकाने खो-खो चा विश्वकप जिंकून देशात बीड जिल्ह्याला जो बहुमान मिळवून दिला आहे. तो निश्चितपणे दिलासा देणारा आहे.सुत्रसंचलन सुरेश शिनगारे यांनी केले. साजिद शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व आडससह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण खेळाडूंमध्ये गुणवत्ता; प्रोत्साहानाची गरज : इंगळे
सत्काराला उत्तर देताना प्रियंका इंगळे म्हणाली, पहिल्याच आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेचा विश्वकप मिळवून देणाऱ्या भारतीय महिला संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला मनस्वी आनंद आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये ही ती गुणवत्ता आहे, परंतू त्यांना पालकांनी खेळायला संधी देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. शालेय मुलांनी आवडत्या खेळाचा कसून सराव केल्यास त्यांनाही राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळातील नैपुण्य दाखविता येते. त्यासाठी ग्रामीण क्रिडांगण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याचा आशावाद व्यक्त केला.
यांचा ही केला सत्कार
राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित दयानंद माध्यमिक विद्यालय, खडकी देवळा येथील दीक्षा गाडे या खेळाडूने संघाचे नेतृत्व केले. या संघात याच विद्यालयाच्या दिपाली रेडे व स्वरूपा दराडे या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाने राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत उपविजेतेपदासह रजत पदक मिळवल्याबद्दल खेळाडू व मार्गदर्शक क्रिडा शिक्षक संजय इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.