विश्र्व शांती साठी बुद्ध तत्वज्ञान हेच मार्गदर्शक : भदंत अतूरलिय रतन महाथेरो
बीड (प्रतिनिधी): “बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आचरणात अवलंब केल्याने अंतर्मनाची शुद्धी होते आणि अद्वितीय ऊर्जा व अत्यानंदाचा अनुभव येतो,” असा उपदेश श्रीलंकेचे माजी खासदार आणि राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार भदंत अतुरलिय रतन महाथेरो यांनी धम्मपरिषदेतील धम्मदेसनेतून दिला. बीड जिल्ह्यातील महाविहार धम्मभूमी, मौजे शिवणी येथे आयोजित ६८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या वेळी त्यांनी आपले विचार मांडले.
महाथेरो यांनी त्यांच्या धम्मदेसनेत सांगितले की, श्रीलंकेतील विहारांमध्ये आम्ही चार गोष्टींचा नियमित अभ्यास करतो—व्यायाम, प्राणायाम, गाथा पठन, आणि समाधी. “बुद्धम् शरणं गच्छामी” या तीन शब्दांचे जसे श्रीलंकेत नियमित पठन होते, तसेच भारतात “जय भीम” हे शब्द महत्त्वाचे स्थान घेतात. या शब्दांचे श्रद्धेने आणि लयीत पठन केल्याने शक्तीशाली ऊर्जा निर्माण होते, जी आत्मिक आनंद देणारी ठरते, असे ते म्हणाले. त्यांनी सिंहली भाषेत दिलेल्या संदेशाचे विपस्सनाचार्य भिक्खु पञ्ञारतन थेरो यांनी भाषांतर केलं. बीड तालुक्यातील महाविहार धम्मभूमी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी येथे ६८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित अखिल भारतीय पाचवी बौद्ध धम्म परिषदेमध्ये त्यांनी दिलेल्या मौल्यवान उपदेशाने उपासक कृतार्थ झाले.
भिक्खु अतुरलिय रतन महाथेरो यांनी बुद्ध गाथेचे सामूहिक पठन लयीत करून घेतले, ज्यामुळे उपस्थित अनुयायांना एकाग्रतेची अनुभूती मिळाली. ते पुढे म्हणाले की, “पूर्ण समाधी मिळाल्याशिवाय विपश्यनेचा खरा अनुभव येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते, त्यांनी भारतातील वंचित वर्गाला दुःखातून मुक्त केले,” असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केल
परिषदेला सुरुवात डॉ.भिक्खु उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.१२) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथून बुद्धमुर्तीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भिक्खुसंघ, उपासक, उपासिका यांच्यासह धम्म मिरवणुकीस प्रारंभ होऊन शिवणी येथे मिरवणुकीचा समारोप झाला. दुपारच्या सत्रात बोधीवृक्षाची पुजा करुन धम्मपरिषदेचे उद्घाटन भिख्खू डॉ. इंदवंस्स महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या वेशातील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्षवेधून घेतले.
विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी आपल्या भाषणात सर्व विहारांना शैक्षणिक केंद्रे बनवण्याची आवश्यकता व्यक्त केली, तर प्रो. डॉ. संजय मोहड यांनी बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांचा दाखला देत दानाची महत्ता विशद केली.या
समारंभात विविध प्रांतातील भिक्खू, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मपरिषदेत यावेळी भिक्खु करुणानंद थेरो छत्रपती संभाजीनगर, भिख्खू अनुरुद्ध थेरो, भिक्खु महावीरो थेरो अहमदपुर, भिक्खु धम्मघोष थेरो हिंगोली, भिक्खु चंद्रमुनी हिंगोली, भिक्खु पञ्ञावर्धन हिंगोली, पु.भिक्खु नागसेन छत्रपती संभाजीनगर, भिक्खु बुद्धभूषण, भिक्खु अश्र्वजित थेरो यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत मगर यांनी केले तर सूत्रसंचलन दीपक भालेराव यांनी केले.
परिषदेचे स्वागताध्यक्ष डॉ. सुनील सरवदे (चेअरमन माऊली मल्टीस्टेट, नाशिक) होते. आभार राम गायकवाड यांनी व्यक्त केले. परेश मोरे, रमेश गंगाधरे, अल्काताई डोंगरे यांनी भोजनदान दिले.