माणसाचे माणसा सोबत असलेले माणुसकीचे नाते हेच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू होय – भिक्खू धम्मशील थेरो
माजलगाव ( वार्ताहार ) माणसाचे माणसा सोबत असलेले माणुसकीचे नाते हाच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे, म्हणून माणूस असाल तर माणसा सारखे वागले पाहिजे.जी माणसे माणसा सोबत उचित व्यवहार करतात तीच माणसे खरी सुखी असतात.समस्त मानव जातीला मनुष्यत्व प्राप्ती साठी बुद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही.असे प्रतिपादन आपल्या साप्ताहिक प्रवचनात पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी केले.
सदधम्म सेवा संघाच्या वतीने श्रावस्ती बुद्ध विहार केसापुरी वसाहत येथे साप्ताहिक धम्मदेसनेच्या प्रवचन मालिकेत दि.8 सप्टेंबर 2024 रोजी पू. भिक्खू धम्मशील थेरो आपल्या मानवी जीवनात बुद्ध धम्माचे महत्त्व या विषयावरील प्रवचन मालिकेत पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. पुढे बोलताना भिक्खू म्हणाले की,
बुद्धाचा धम्म हा बहुआयामी असून माणसाचे मंगल होण्यासाठी सर्वांगीण मार्ग सांगतो. मानवी जीवनाचा उत्कर्ष बुद्ध धम्मातच असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षाच्या काळात विविध धर्माच्या अभ्यासानंतर बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला.धम्म मनोरंजनाचा नाही तर, धम्मात नीतीमतेला स्थान आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म आहे.
इथे मनाला विचारांचा आहार दिला जातो. आपले वर्तन सुधारायचे असेल तर केवळ मनोरंजन करून जमणार नाही. खरा धम्मरस समजून घ्यावा लागेल.
अर्थात धम्माचा उद्देश समजून घ्यावे लागेल. यापैकी पहिला उद्देश माणसाने मनुष्यत्व प्राप्ती करून घेणे आहे.
माणूस असाल तर माणसा सारखे वागा केवळ माणसासारखे दिसणे दिसणे अपेक्षित नाही. माणसाने जनावरासारखे वर्तन करू नये. असे दुर्गुण नष्ट करून माणसाने माणसासोबत असलेल माणुसकीचे नाते जपणे गरजेचे आहे.आणि हीच बुद्ध धम्माची खरी शिकवण आहे. माणसातील पशुत्व नाहीसे करणारे औषध म्हणजे बुद्ध धम्म होय.
आजच्या पूजेचे यजमान लताताई मथुरादास बनसोडे आणि ज्योतीताई तेजसकुमार बनसोडे त्यांच्या वतीने उपस्थितांना भोजनदान देण्यात आले.