अतिवृष्टीच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रशासनाला सूचना.
जिल्हाधिकारी, रस्ते विकास महामंडळ, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केला पत्रव्यवहार
बीड दि.२ (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरु असून सर्व ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. तसेच या अनुषंगाने काळजी घेण्याची गरज असल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या असून याबाबत जिल्हाधिकारी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता व बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथे भूस्खलनाचा होण्याचा धोका आहे. सदरील गावात ८० ते ८५ कुटुंबे असून ५०० ते ६०० लोक सध्या त्याठिकाणी वास्तव्यास आहेत. या गावाची रचना, वरच्या बाजूला डोंगर व खालच्या बाजूला नदी आणि मधोमध गाव अशाप्रकारची आहे. त्यामुळे तेथे भूस्खलन होण्याचा धोका सातत्याने जाणवत आहे. या गावातील लोकांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने या गावाचे पुनवर्सन करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. तसेच याबाबतचा प्रस्तावही गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. दरम्यान सद्यस्थितीला गावातील कुटुंबे व नागरिकांचे सरंक्षण व्हावे यासाठी नदीच्या कडेला व डोंगरी भागात सरंक्षण भिंत बांधणे, डोंगरी भागात लोखंडी जाळी मोठया प्रमाणात बसवावी यासोबतच येथील सुरक्षेसाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व बाबी त्याठिकाणी राबविण्यात याव्यात यासोबतच बीड जिल्ह्यात अशाप्रकारचा धोका असलेल्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी मागणी केली आहे. तसेच बीड शहरात मागील दोन दिवसांच्या अतिवृष्टीने शहरात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बीड शहरानजीक असलेल्या बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने बीड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना नगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. परंतु याबाबत काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेअभावी नागरिकांच्या राहत्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून दैनंदिन जीवन, आरोग्य तसेच इतर प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत नगरपालिकेच्या वतीने नाली स्वच्छता करून नागरिकांना रस्ते व सोयीसुविधा देण्यासाठी यंत्रणेला आदेशित करा अशा सूचना आ.क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच मांजरसुम्बा-लिंबागणेश-पाटोदा रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. हा रस्ता मोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जाधव-वस्ती याठिकाणाहून जातो परंतु याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम होऊन पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असताना याठिकाणी अशी कोणतेही काम झाले त्यामुळे सध्या सदरील ठिकाणी वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतात पाऊस झाला कि पाणी शिरते. दरम्यान दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे त्यांच्या शेतात आणि घरात आजदेखील पाणी साचून राहिले असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संभाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करून तातडीने मांजरसुम्बा-लिंबागणेश-पाटोदा रस्त्यावर जाधव वस्ती येथे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सर्व पिकांची सरसकट नुकसान भरपाई द्या
बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सलग तीन-चार दिवस पावसाची संततधार असल्याने शेतातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सातत्याच्या आस्मानी संकटाने शेतकरी घाईला आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सर्व पिकांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.