अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट तात्काळ पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी–अशोक डक
माजलगाव( प्रतिनिधी)–गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे केवळ शेतीच नव्हे तर रस्ते, नदी-नाल्यालगतची जमीनही मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक डक यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
१३ ऑगस्टपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील १७ महसुलमंडळात अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी ही पिके पाण्याखाली गेली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नदी-नाल्यालगत असणाऱ्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.
याशिवाय गावांना शहराशी जोडणारे रस्ते तसेच शेतात जाणारे पायवाटेचे रस्ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अशोक डक यांनी केली आहे.