वाचनाशिवाय समाज प्रगती अशक्य–उपलेखा अधिकारी किरणकुमार खिल्लारे यांचे प्रतिपादन
तुलसी समूहातर्फे डॉ.अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
बीड (दि.२): महापुरुषांचे विचार, त्यांची आत्मचरित्रं आणि ग्रंथ हे आपल्याला प्रेरणा देतात, आपल्या कृतीला योग्य दिशा दाखवतात. आजचा तरुण जर मोबाईलऐवजी पुस्तक हातात घेत असेल, केवळ मनोरंजनाऐवजी विचारांचा स्वीकार करत असेल, तरच समाजाचा प्रगतीचा आलेख खऱ्या अर्थाने वर जाईल, असे प्रतिपादन उपलेखा अधिकारी किरणकुमार खिल्लारे यांनी केले.
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि.२ रोजी तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे, प्रा.शरद वंजारे, प्रा.राम गायकवाड,श्री.उत्तम पवार, डॉ.चंद्रकांत साळवे, श्री.एकनाथ मुजमुले, प्रा.अर्जुन राठोड आदी उपस्थित होते.
पुढे खिल्लारे यांनी, शिक्षण घेतल्यानंतर आपण केवळ स्वतःपुरता विचार न करता, समाजाच्या उन्नतीसाठीही काम केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी हेच करून दाखवलं अल्पशिक्षण असूनही त्यांनी आयुष्य शोषित-वंचितांच्या सेवेसाठी वाहिलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाजपरिवर्तनासाठी पुढाकार घेतला पाहिजे,असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठेंच्या ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या प्रसिद्ध गीताचा अर्थ सोप्या शब्दांत समजावून सांगितला. त्यांनी सांगितले की, हे गीत फक्त भावनिक गाणं नसून, महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात राहणाऱ्या मराठी माणसांच्या वेदनांना, त्यांचं दुःख आणि घरापासून दूर राहण्याची खंत यांना आवाज देणारं आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा.प्रदीप रोडे यांनी महापुरुषांचे साहित्य आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहे, मात्र ते वाचून आपण काय शिकलो आणि त्याचा जीवनात कसा उपयोग केला, हे अधिक महत्त्वाचे आहे. जयंती साजरी करणं ही केवळ औपचारिकता न राहता, त्या महामानवांच्या विचारांना कृतीत उतरवण्याची प्रेरणा ठरली पाहिजे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य प्रा.डी.जी. निकाळजे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला. प्रा.अंकुश कोरडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर प्रा. किशोर वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विशेष कार्यक्रमाला तुलसी शैक्षणिक समूहाच्या विविध युनिट्समधून आलेले सर्व प्राचार्य डॉ.अशोक धुलधुले, प्रा.डी.जी. निकाळजे, सौ.उमा जगतकर, प्रा.बी.डी.राऊत, प्रा.प्रकाश ढोकणे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.