लोकाशा महोत्सवासाठी अजित पवार, पंकजाताईचीं प्रमुख उपस्थिती; 2 एप्रिलला दिमाखदार सोहळा
शांतीलाल मुथ्था,सयाजी शिंदे, राधेशाम चांडक, राहूल आवारे, निखीला म्हात्रे, भरत गिते, ओमप्रकाश शेटे, विलास बडे, मंगेश चिवटे, यांना लोकाशा भूषण पुरस्कार जाहीर
एक लक्ष रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन होणार गौरव
बीड, दि.20 ( प्रतिनिधी ) दैनिक लोकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त दि.31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान लोकाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, लोकाशा महोत्सवाचा समारोप राज्याचे उपमुखमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पकंजाताई मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह बीड जिल्ह्यातील खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे. लोकाशा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन, गौरविण्यात येणार आहे. एक लक्ष रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे . सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शांतीलालजी मुथा, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेशामजी चांडक, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रसिद्ध कुस्तीपटू राहूल आवारे, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल टी.व्ही.-9 च्या अँकर निखीला म्हात्रे आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल ओमप्रकाश शेटे, व मंगेश चिवटे पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विलास बडे यांना यावर्षीचा लोकाशा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, दि.2 एप्रिल रोजी सायं. 5 वाजता दैनिक लोकाशाच्या प्रांगणात दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संपादक विजयराज बंब यांनी दिली.लोकाशा महोत्सवा संदर्भात माहिती देताना, संपादक विजयराज बंब यांनी सांगितले की, लोकाशा महोत्सवाची सुरुवात 2010 साली करण्यात आली होती. यावर्षी लोकाशाच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त दि.31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय लोकाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.31 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम होणार आहे . यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. होम मिनीस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना प्रथम बक्षीस कुलर, द्वितीय बक्षीस सोन्याची नथ तर तृतीय बक्षीस आकर्षक पैठणी मिळणार आहे . दि.1 एप्रिल रोजी सायं.5 वाजता खुल्या व सोलो डान्स स्पर्धा होणा आहेत. खुल्या डान्स स्पर्धेतील स्पर्धकांना प्रथम बक्षीस 11000 रूपये, दितीय बक्षीस 5000 रूपये, तर तृतीय बक्षीस 3000 रूपये. मिळणार आहे. सोलो डान्स स्पर्धा दोन गटात होणार असून, दोन्ही गटाना प्रत्येकी प्रथम बक्षीस 5000 रूपये, द्वितीय बक्षीस 3000 रूपये, तर तृतीय बक्षीस 2000 रूपये, देण्यात येणार आहे .
अमृतमहोत्सवी सत्कार लोकाशा महोत्सवात ज्या दांम्पत्यांचे वय 75 वर्षापेक्षा अधिक आहे अशा 75 दांम्पत्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे, यशिवाय जे कुटुंब एकत्र राहते अशा 25 आदर्श कुटुंबाचा सत्कार करण्यात येणार आहे .
लोकाशा महोत्सवातील सर्व कार्यक्रमास बीड शहर व जिल्ह्यातील जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संपादक विजयराज बंब व लोकाशा महोत्सव समितीने केले आहे .