बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.26 – महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे.बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे.महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल.त्यामुळे 1949 चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौद्ध असावेत असा कायदा करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरात रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून राज्यात रिपब्लिकन पक्ष लवकरच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठे आंदोलन पुकारणार आहे.अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.
महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.बिहार सरकार आणि केंद्र सरकार शी बोलणार आहोत.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून देण्याचा आपला निर्धार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.येत्या 2 मार्च रोजी नाशिक गोल्फ क्लब मैदान येथे बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून त्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असून या बौद्ध धम्म परिषदेस राज्यभरातून हजारो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहतील अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.