समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि जबाबदारीची जाणीव ठेवावी: सुप्रिया वक्ते
पौष पौर्णिमेनिमित्त बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण
बीड : पौष पौर्णिमा हा बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असून, त्यांच्या शिकवणी आणि धम्मदेशनाचा मार्ग साजरा करण्याचा हा काळ आहे. तसेच, हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर चिंतन करण्याची संधीही आहे, असे प्रतिपादन वडवणी येथील नायब तहसीलदार सुप्रिया श्रीमंत वक्ते यांनी केले.
महाविहार धम्मभूमी, डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर, शिवणी येथे प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने सोमवारी (दि. १३) पौष पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी भिक्खु धम्मशील थेरो यांनी धम्मदेसना दिली.
कार्यक्रमात प्रा. डॉ. अनिता शिंदे, प्रा. डॉ. राणी जाधव आणि प्रा. आकांक्षा सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी सुप्रिया वक्ते म्हणाल्या की, बुद्धांच्या जीवनात प्रत्येक पौर्णिमा महत्त्वाची ठरली आहे. पौष पौर्णिमेला दोन ऐतिहासिक घटना घडल्या—बुद्धांनी आपल्या पाच शिष्यांना पहिली धम्मदीक्षा दिली आणि मगध नरेश बिंबिसाराने वेळूवन भिक्खू संघास दान केले.
त्या पुढे म्हणाल्या की, बौद्ध धम्मातील शिकवणी आजही तितक्याच प्रासंगिक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या शिकवणुकीतून समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा संदेश मिळतो.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “बुद्धांच्या शिकवणींनी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या तत्त्वांवर चालतच मी प्रशासकीय सेवेत काम करत आहे. समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि जबाबदारीची जाणीव ठेवावी.”
समारोप करताना त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना बुद्धांच्या धम्ममार्गावर चालण्याचे आवाहन केले. पौर्णिमेचा प्रकाश अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे धम्माचा प्रकाश अज्ञान आणि दुःख दूर करून समाजात शांती आणि समता प्रस्थापित करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमादरम्यान भिमबाणा 2025 या दिनदर्शीकेचे विमोचन उत्तमजी हजारे यांच्या संयोजनाखाली भिक्खु संघ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून शेकडो उपासक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. अशोक गायकवाड यांनी केले तर आभार भास्कर सरपते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या सभासदांनी परिश्रम घेतले.