आधार मल्टीस्टेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक उर्जास्त्रोत – अॅड.अजय बुरांडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरातील आधार मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड शाखा अंबाजोगाई येथे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन पार पडला.
यावेळी प्रसिद्धी विधिज्ञ अॅड.अजय बुरांडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण आयुष्याची जडण-घडण व सारीपाट विषद केला. यावेळी बोलताना अॅड.बुरांडे म्हणाले की, बाबासाहेब म्हणजे भारत देशाचे एक उर्जास्त्रोत होते. त्यांचा सर्व विषयांचा अभ्यास हा दांडगा होता. त्यांना एकूण नऊ भाषा अवगत होत्या
अंबाजोगाई शहरातील आधार कॉ.ऑप.मल्टीस्टेट ही सहकार व आर्थिक चळवळीतील व्यक्तींचे आधारस्तंभ म्हणून काम करत आहे. ज्या-ज्या चळवळी उदयास येतात. त्या चळवळींना बळकटी देण्याचे काम आधार मल्टीस्टेट करत असते. त्या सोबतच समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी जे वेगवेगळे घटक आहेत. त्या घटकांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याचा आधार मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी चा प्रयत्न राहिलेला आहे. सामाजिक चळवळ गतीमान करण्यासाठी ही मल्टीस्टेट काम करत आहे. त्याअनुषंगाने सामाजिक स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा एक भाग म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने व्याख्यान व चित्रफित दर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकपाचे बीड जिल्हा सचिव अॅड.अजय बुरांडे हे होते. तर या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मल्टीस्टेटचे चेअरमन अॅड.सुनिल सौंदरमल, ज्येष्ठ संचालक प्रा.डी.जी.धाकडे, ज्येष्ठ संचालक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व सूर्यवंशी पाटील स्टेनो माजलगाव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील माहिती पट दाखविण्यात आला. त्यानंतर अॅड.अजय बुरांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र उलगडले. याप्रसंगी बोलताना अॅड.बुरांडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व जगाच्या पाठीवर लाभलेले एक मोठे वरदान आहे. आजच्या काही सामाजिक चळवळी अस्तित्वात आहेत. किंवा जो काही सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. ती बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेब हे नाव अवघ्या जगभर व्यापलेले आहे. त्यांच्या कामाचा आवाका हा संपूर्ण जगात राहिलेला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास करून सर्व घटकांना कायद्याच्या आणि विशेषतः संविधानाच्या कक्षेत घेवून त्यांना न्यायदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न केले. बाबासाहेबांनी जो मार्ग दाखविला. त्या मार्गावर जो चालेल त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे. चळवळीचे अंग असलेले बाबासाहेब हे नक्कीच इतर महापुरूषांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचा त्याग आणि समर्पन हे कोणीही विसरू शकत नाही. बाबासाहेबांनी वंचित, शोषित,पिडीत, दुर्लक्षित घटकांना पटलावर आणून त्यांचे जीवन व जगणे सुसय्य करण्याचे काम केले आहे. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगाच्या पाठीवर कोरलेले आहे. आणि ते नाव जोपर्यंत मानवजात भुतलावर आहे. तोपर्यंत कोणीही मिटवू शकणार नाही एवढ्या दिव्य दृष्टीचे ते महामानव होते. या प्रसंगी चेअरमन अॅड.सुनिल सौंदरमल यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जर आणखी दहा वर्ष राहिले असते. तर वेगळा भारत आणि वेगळी परिस्थिती राहिली असती. परंतु त्यांना तेवढे आयुर्मान लाभले नाही. तरी देखील त्यांनी जगाला हेवा वाटावा असे काम केले. बाबासाहेब हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. दलित बौद्ध चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली. आणि सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले. भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हणून त्यांनी काम पाहिले. असे हे आभाळाएवढे व्यक्तीमत्व आज जरी नसले तरी त्यांचे दिव्य कार्य हे येणारे हजारो लाखो वर्षे अबाधित राहणार आहे. यात कसलीही शंका नसल्याचे अॅड.सौंदरमल म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आधार मल्टीस्टेच्या दिनदर्शिका-2025 चे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आधार मल्टीस्टेटचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, सहकारी,स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी परिश्रम घेतले.